शनिवार, 28 जनवरी 2017

ठाकरे बंधू एकत्र आल्यास चित्र बदलेल : मनोहर जोशी

पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावे, अशी सर्वांची इच्छा आहे; मात्र त्या दोघांची इच्छा असायला हवी. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाचे चित्र बदलेल, असे विधान शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी शनिवारी केले.

नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित युवा संसदेच्या उद्‌घाटनापूर्वी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना-भाजप युती तुटल्याने ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी अटकळ बांधली जात आहे. याबाबत विचारले असता जोशी म्हणाले, ""दोघांनी एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी मी मध्यस्थी करणार नाही. दोघे एकत्र आले, तर यश अधिक जवळ येईल. राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल.''
युती तुटल्याचा फायदा 
"युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. त्याचा नक्कीच फायदा होईल. मी ज्योतिषी नसलो तरी सांगतो, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा मिळवेल. "युतीत पंचवीस वर्षे सडली' या उद्धव यांच्या मताशी मी सहमत आहे. उद्धव हे पक्ष समर्थपणे चालवत आहेत,'' असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.
शिकलेले मंत्री हवेत 
शिक्षण विभागाशी संबंधित म्हणजेच सेल्फीसारखे काही निर्णय मागे घेण्यात आले. यावर कुणाचेही नाव न घेता, ""शिकलेला आणि हुशार माणूस मंत्री व्हायला हवा. निर्णय घेण्याचा आवाका नसणारी माणसे मंत्री होत असल्याने निर्णय चुकतात. मंत्रिपद देण्याची जबाबदारी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि संबंधित पक्षाची असते. सोयीनुसार मंत्री नेमण्यापेक्षा देश पुढे नेतील, अशा लोकांनाच मंत्रिपद द्यावे,'' अशी टीका मनोहर जोशी यांनी केली.