शनिवार, 1 अक्तूबर 2016

सलमानला पुळका असेल, तर पाकला जावे: राज

मुंबई : "बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) हिंदी चित्रपटसृष्टीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास येथील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांच्या संघटनेने बंदी घातली आहे. यावर सलमान खानसह काही कलाकारांनी नाराजीचा सूर लावला होता.


‘पाकिस्तानमधील कलाकार दहशतवादी नाहीत,‘ असे वक्तव्य सलमान खानने केले होते. या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी आज समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, "कलाकार आभाळातून पडले आहेत का? कलाकारांना सीमा नसतात म्हणे! कर्नाटक-तमिळनाडूमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद झाले, तेव्हा दोन्ही राज्यांतील कलाकार रस्त्यावर उतरले होते. त्यांना त्यांच्या सीमा कळतात. ते स्वत:च्या राज्याच्या पाण्यासाठी उभे राहिले आणि यांना (हिंदी चित्रपटांतील कलाकार) स्वत:च्या देशासाठी उभे राहता येत नाही? पाकिस्तानच्या ज्या कलाकारांना यांना पुळका आहे, त्यांना खुद्द पाकिस्तानमध्ये तरी किंमत आहे का? ‘पाकिस्तानचे नागरिक चांगले आहेत‘ असा यांचा दावा असतो. पण आमच्यासमोर त्यांचे दहशतवादीच येत असतात. सलमान खानला पाकिस्तानविषयी एवढेच प्रेम असेल, तर ‘बजरंगी भाईजान‘चे चित्रिकरण पाकिस्तानमध्ये जाऊन का नाही केले?‘‘

राज ठाकरे म्हणाले..
  • ‘पाकिस्तानचे काय करावे‘ आणि त्यांच्याशी कसे वागावे, हे ठरवायला पंतप्रधान आणि आपले लष्कर सक्षम आहे. त्यांना इतर कुणी सल्ले देण्याची गरज नाही. 
  • ‘सर्जिकल स्ट्राईक‘नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. 
  • ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी‘वर पाकिस्तानमध्ये बंदी घातली आहे. हे कसे काय चालते? 
  • ‘आयपीएल‘मध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर ‘बीसीसीआय‘ने बंदी घातली आहे. त्यावेळी ‘खेळाडू दहशतवादी नसतात‘ असे कोणताही खेळाडू म्हणाला नाही. मग कलाकारच असे का बोलतात? 
  • फवाद खान पाकिस्तानमध्ये जाऊन सांगतो, की मला माझा देश प्रिय आहे आणि मी निषेध करणार नाही. निषेध करणार नाही, मग इथे काम कसे काय करू शकतो? 
  • उद्या सीमेवरील जवानाने हातातील शस्र खाली ठेऊन ‘पाकिस्तानच्या कलाकरांची मैफल ऐकतो‘ म्हटले, तर देशाची सुरक्षा कोण करणार? सलमान खान?