शुक्रवार, 31 जनवरी 2014

काम करायचे नसल्यास चालते व्हा - राज ठाकरे

पुणे - ""सामान्यांच्या उपयोगी न पडता केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून पक्षात राहायचे असेल तर चालते व्हा. समाजासाठी, पक्षासाठी काम करणारी तरुणांची दुसरी टीम माझ्याकडे तयार आहे,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी फटकारले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दुसऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यपद्धती व पक्षसंघटन या विषयावरून त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ते म्हणाले, ""केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून काम करू नका. सतत लोकांची कामे होती घ्या, त्यांच्या उपयोगी पडा; तरच लोक तुम्हाला विचारतील. जाहीर सभांमधून भाषणे करून मी मते मागायची आणि तुम्ही त्याचा फायदा स्वत:साठी उठवत राहायचे, हे चालणार नाही. लोकांना उत्तर मला द्यावे लागणार आहे. त्यामुळे ज्यांना केवळ स्वत:चे हित साधून घ्यायचे आहे, त्यांनी जागा खाली करा. तरुणांची दुसरी टीम लगेच तयार आहे.''

राज यांनी संघटनेच्या जिल्हानिहाय कामाचा, तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ज्यांचे काम चांगले आहे त्यांचे कौतुक करीत, असमाधानकारक काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी फटकारले. निवडणुकीत दरहजारी प्रमुखांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हजारी प्रमुखाला योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. त्यांची ती जबाबदारी आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाली पाहिजे. जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांची यात मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

राज यांच्या भाषणाआधी राज्यभरातून आलेले जिल्हाप्रमुख, तसेच शहरप्रमुखांनी आपल्या कामाचा अहवाल सादर केला. या मेळाव्याला आमदार बाळा नांदगावकर, दीपक पायगुडे, अनिल शिदोरे यांच्यासह पक्षाचे सर्व उपाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.

पोलिस कारवाई करणार का?
या मेळाव्यासाठी राज ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. शेजारीच शाळेचे वर्ग सुरू होते याचे भान न ठेवता विनापरवानगी आतषबाजी करणाऱ्या संयोजकांवर पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

बुधवार, 29 जनवरी 2014

अटकेच्या शक्‍यतेनंतरही राज पुणे दौऱ्यावर ठाम

मुंबई - टोलनाक्‍याच्या वसुली विरोधात मनसेकडून सुरू करण्यात आलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरातील 54 टोलनाक्‍यांची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, टोलप्रश्‍नी पुण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी आपला पुणे दौरा ठरलेल्या कार्यक्रमानुसारच घेण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.

मुंबईतील आरे टोल नाका येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ टोलवसुली रोखून धरली होती. आज तिसऱ्या दिवशीही मनसे कार्यकर्त्यांनी टोलची तोडफोड सुरूच ठेवली आहे. तोडफोडीमुळे टोलनाक्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

तोडफोड करण्याच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे. पण त्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवले आहे. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या विषयावर आंदोलन करीत असल्याने राज यांनी अटक करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. ठरल्याप्रमाणे राज उद्या (गुरुवारी) पुण्याला रवाना होणार आहेत. 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता बीएमसीसी कॉलेजजवळील दराडे हॉलमध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी शहरातील काही कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

सोमवार, 27 जनवरी 2014

राज्यात 'मनसे'ची 'टोल'धाड

मंगळवार, 28 जानेवारी 2014
मुंबई - 'टोल वसुलीचे कारण समजल्याशिवाय राज्यातील एकाही नाक्‍यावर टोल भरायचा नाही. टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा,'' असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद कालपासूनच राज्याच्या विविध भागांत उमटले. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या टोलनाक्‍यांवर "मनसे'च्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्‍यांवर तोडफोड केली.

'मनसे'च्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाक्‍यावर आंदोलन करून तेथील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे बराच वेळ दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. दहिसरमध्ये मनसेचे नेते प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांनी टोलनाक्‍याविरोधात आंदोलन केले. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले.

मनसेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्या वेळी बोलताना ठाकरे यांनी टोलविरोध भूमिका मांडली होती. महाराष्ट्रात टोलच्या नावाखाली दररोज लाखो रुपयांची लूट सुरू आहे. ती त्वरित थांबली पाहिजे; अन्यथा टोल नाके तोडल्याशिवाय मनसेचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता.

नवी मुंबई, पुणे, सांगली, बीड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथेही तीव्र आंदोलने करण्यात आली. कॉंग्रेसने मात्र टोल रद्द करता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

नवी मुंबई, मुंबई एरोली, वाशी, मुलुंड, दहिसर येथे टोलबूथ व केबिनचे नुकसान. "मी टोल भरणार नाही', अशा आशयाचे स्टीकर गाड्यांवर चिकटविले. प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे, संजय घाडी आदी नेत्यांना अटक. 50हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे.

खालापूर (द्रुतगती महामार्ग, रायगड) वाहतूक रोखून धरली. पुणे आणि मुंबई दोन्ही बाजूंकडून वाहनांच्या रांगा

पुणे चांडोली (पुणे-नाशिक मार्ग), उर्से, शेवाळेवाडी (लोणी काळभोर), चांदणी चौक, आंबेगाव येथे आंदोलन. चांडोलीला पोलिस निरीक्षकाच्या डोळ्यात काच घुसली. जांभूळवाडी नवीन बाह्यवळण महामार्गालगत रिलायन्स कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड. मांजरीला पोलिस बंदोबस्त असतानाही नाका फोडला. महिला कार्यकर्त्यांना अटक.

सांगलीवाडी (सांगली) टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्‍याच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. डिजिटल फलक फोडले. 25 जणांविरुद्ध गुन्हा.

मराठवाडा मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांतील टोलनाक्‍यांची रविवारी रात्री आणि सोमवारी तोडफोड केली. औरंगाबाद-नगर मार्गावरील वाळूजजवळील (औरंगाबाद) टोलनाक्‍यावर कडक पोलिस बंदोबस्तामुळे तोडफोडीचा प्रयत्न फसला.

विदर्भ नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, भंडारा आणि बुलडाणा जिल्ह्यांतील एकूण 10 टोलनाक्‍यांवर "मनसे' आंदोलन. पैकी नागपूर जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन, तर वर्धा जिल्ह्यातील एका टोलनाक्‍याची तोडफोड करण्यात आली. उमरेड रोडवरील टोलनाक्‍याची मुदत संपली असतानाही अनेक वर्षांपासून अवैध वसुली केली जात आहे. कालांतराने टोलचे दर कमी केले जातात. मात्र, येथे दर वाढवण्यात आले आहेत.

राज्यात पंधरा वर्षांपासून टोलचे धोरण आहे. त्याचा त्रास होत असेल, तर ते दूर कसे करता येईल, यावर विचार होऊ शकतो. परंतु, टोल भरू नका. मोडतोड करा, असे कोणी सांगत असेल, तर तपासणी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. "टोल फ्री' रस्त्यांचा यापूर्वी विचार झाला आहे. परंतु त्यासाठी येणारा बोजा पाहिला, तर सर्व विकासकामे बंद करावी लागतील. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा देता येईल, का या दृष्टीने विचार सुरू आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्याची महत्त्वाची कामे खासगी संस्थांकडून केली जातात. यासाठी "टोल' द्यावा लागतो. जो चारचाकी गाडी घेऊ शकतो, तो टोलही भरू शकतो. गुजरातमधील रस्तेदेखील "टोल फ्री' नाहीत.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री, 

संगमनेर बाह्यवळण रस्त्याच्या उद्‌घाटनावेळी अशा प्रकारची तोडफोड करण्याला राजकारणात स्थान नाही. टोल आकारणीबद्दलचे आक्षेप दूर करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत.
- मुकुल वासनिक, कॉंग्रेसचे प्रवक्ते

रविवार, 26 जनवरी 2014

टोलला 'मनसे'विरोध, 'राजा'ज्ञेने तोडफोड

कुठेही टोल भरू नका, टोलनाक्यावर कोणी अडवलं तर त्याला तुडवा, टोलवसुली करू देऊ नका, वाहतूक कोंडी झाली तरी चालेल, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश देताच त्याचे पडसाद लगेच उमटले. मनसे कार्यकर्त्यांनी राज यांचे नवी मुंबईतले भाषण संपताच ऐरोली टोलनाक्यावर तोडफोड केली. ऐरोली नंतर मुंबई, ठाणे, कल्याण, सांगली आणि नागपूर येथे मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर तोडफोड केली.

राज यांच्या भाषणानंतर लगेच राडा करुन मनसेने आपणही टोलच्या टोलवाटोलवीचे राजकारण करणार असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. याआधी कोल्हापूरमध्ये टोलवसुली विरोधात हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनाला शिवसेनेकडून पाठिंबा मिळाला. नंतर शिवसेनेने ठिकठिकाणी रस्त्यांवर खासगी कंपन्यांकडून होणा-या टोलवसुलीला विरोध करण्याचे संकेत दिले. शिवसेनेच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसताच राज यांनी जुनेच टोलविरोधाच्या आंदोलनाचे अस्त्र नव्याने बाहेर काढले.

नवी मुंबई येथे मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या राज यांनी टोलवसुलीला जाहीर विरोध केला. जोपर्यंत टोल कशासाठी घेतला आणि त्याचा काय उपयोग केला? हे सांगितले जात नाही तोपर्यंत टोल देऊ नका, अशा स्वरुपाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. टोलवसुलीसाठी कोणी अडवल्यास त्याला तुडवा, वाहतूक कोंडी झाली तरी टोल बिलकूल देऊ नका; असे राज ठाकरे म्हणाले.

सरकार खासगी कंपन्यांना हितसंबंध जपण्यासाठी टोलवसुलीची परवानगी देते. या टोलच्या बदल्यात नागरिकांना प्रवास सुरळीत आणि सुरक्षितपणे व्हावा म्हणून किमान सुविधाही मिळणार नसतील तर टोल देण्याची गरज काय?, अशा स्वरुपाची भूमिका राज यांनी आधीच मांडली होती. याच भूमिकेचा पुनरुच्चार करत राज यांनी टोल विरोधाचे राजकारण तीव्र केले आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असताना राज यांनी टोल विरोध सुरू केला आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातली टोलवसुली पूर्णपणे बंद करता येणार नाही, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. राज्यात टोलचे राजकारण नव्याने जोर धरणार असे चित्र दिसत आहे.

Raj Thakre On TollNaka