बुधवार, 28 अगस्त 2013

विधान परिषद निवडणुकीत मनसे तटस्थ

मुंबई - विधान परिषदेच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

विधान परिषद निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात बोलताना सर्वच पक्षाच्या आमदारांनी सद्‌सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आज धनंजय मुंडे यांनी अचानक "कृष्णकुंज'वर धाव घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नंतर लगेच ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना झटका बसला असून त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची आजची भेट राजकीय नव्हती तर केवळ सदिच्छा भेट होती, असे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या हंडीसाठी मनसेचे आतापासूनच थर

गुरुवार, 29 ऑगस्ट 2013 - 03:00 AM

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीचा मुहूर्त साधत येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे थर रचायला सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर आणि ईशान्य मुंबईतून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या निमित्ताने या उमेदवारांना घराघरात नेण्याचा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

लोकसभेच्या उमेदवारांवरून अन्य पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मनसेने नांदगावकर, शिरोडकर आणि नलावडे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उठवत युतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा करणाऱ्या भाजपचे तोंड बंद केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून सणांची पर्वणी साधली जाणार आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने यापूर्वीच पाय रोवले आहेत. राज यांनीही तेथेच लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर घाई करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवारांचा मतदारांशी संवाद वाढावा यासाठी रणनीती आखली आहे.

लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज यांनी बोलावलेल्या बैठकीला नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रीटा गुप्ता; तसेच या मतदारसंघांतील विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली असून आदित्य शिरोडकर यांनी दहीहंडीच्या निमित्ताने टी-शर्ट वगैरे वाटप करीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या तीन मतदारसंघापैकी दोन कॉंग्रेसकडे; तर एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.

तिसऱ्या थरातून मुसंडीची तयारी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईमध्ये मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील निवडून आले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला 32.60 टक्‍के, भाजपला 32.15 टक्‍के आणि मनसेला 29.79 टक्‍के मते मिळाली. दक्षिण-मध्य मुंबईतही मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती (येथे कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले). दक्षिण मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावरील मनसे यांच्यामध्ये मतांची थेट विभागणी झाल्याने कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांना लाभ झाला. आता मात्र दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा गड हलविण्यासाठी मनसेने तेथे अधिक ताकद लावण्याचे ठरवले आहे. एकंदर या तिन्ही मतदारसंघांत सध्या तिसऱ्या थरावर असलेल्या मनसेची विजयाचे दही चाखण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

बीड जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. धनंजय मुंडे हे वडिल पंडित अण्णा मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी नुकताच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे.