शुक्रवार, 13 अप्रैल 2012

अखेर बिहार दिनाचा तिढा सुटला

अखेर बिहार दिनाचा तिढा सुटला
- सकाळ वृत्तसेवा
Friday, April 13, 2012 AT 04:18 PM (IST),  
मुंबई- 15 एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बिहार दिनाच्या कार्यक्रमाचा तिढा अखेर आज (शुक्रवारी) सुटला. बिहार दिनाला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बिहार दिनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये करण्यात येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बिहार दिनाचे आयोजक देवेशचंद्र ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले,""भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे पूर्ण झाली तर बिहार दिनाची शताब्दी कशी काय साजरी करण्यात येत आहे, ते मला समजले नाही. बिहार दिनाला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना माझा विरोध नाही. मुंबईला होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने होणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकता अशा शहरांमध्ये बिहार दिन साजरा होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. परंतु, बिहार दिनाच्या नावाखाली व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये सहन केली जाणार नाही. याची आयोजकांची काळजी घ्यावी.''

बिहारमधील विकासावर राज म्हणाले,""बिहारमध्ये नीतिशकुमार चांगले काम करीत आहेत. तेथे विकासाची कामे सुरू आहेत. असाच विकास सुरू राहिला तर महाराष्ट्रातील बिहारी लोकांनी आपल्या राज्यात परतायला हरकत नाही. समाजवादी पक्षाकडून महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. येथे येऊन आपली ताकद दाखविण्याची भाषा करायची, हे खपवून घेतले जाणार नाही.

गुरुवार, 12 अप्रैल 2012

नितीशकुमार यांनी बिहार दिन साजरा करून दाखवावाच ! राज ठाकरे यांचे आवाहन

नितीशकुमार यांनी बिहार दिन साजरा करून दाखवावाच ! राज ठाकरे यांचे आवाहन


मालेगाव,  वार्ताहर
altसर्वकाही सुरळीत असताना उगाचच आम्हांला डिवचणाऱ्या नितीशकुमारांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच, असे आव्हान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे दिले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने येथे आयोजित प्रचंड जाहीर सभेत राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्याला हात घालतानाच मिळकत जमा करण्यामागे लागलेल्या राज्यातील नेत्यांनाही टिकेचे लक्ष केले. मालेगाव शहराचा विकास असा झालाच नाही, हे स्पष्ट करताना मालेगावसारखी शहरे पाडून पुन्हा बांधावयास हवीत, या शब्दांत राज यांनी मालेगावच्या अधोगतीचे वर्णन केले.
मुंबईत १५ एप्रिल रोजी ‘बिहार दिन’ साजरा करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार येणार आहेत. मुंबईत येण्यासाठी आम्हांला कुणाचा व्हिसा घेण्याची गरज नाही, या नितीशकुमार यांच्या विधानाच्या पाश्र्वभूमीवर राज त्यांना कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. मालेगावच्या जाहीर सभेत नितीशकुमार यांच्या या विधानाचा आपल्या खास ठाकरी शैलीत समाचार घेताना राज यांनी नितीशकुमार यांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच, असे आव्हान दिले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, आम्ही काहीही वक्तव्य केलेले नसताना नितीशकुमार यांनी आम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केला. ते जर असे वागत असतील तर यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांना मराठी माणसाकडून व्हिसा घ्यावाच लागेल. आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असून शासन जर याप्रकरणी आपणांस अटक करणार असेल तर त्यांनी करून दाखवावी. एकदा त्यांनी असा प्रयत्न करून पाहिल्यावर त्याचे काय परिणाम होतात, त्याचा अनुभवही त्यांनी घेतला, असे एकप्रकारे राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही राज यांनी आव्हान दिले.
मालेगावच्या अधोगतीला परप्रांतीयच जबाबदार आहेत. मालेगावच्या समस्या कोणी जाणण्याचा प्रयत्नच केलेला नाही. आम्ही तुम्हांला कोणतेही आश्वासन देणार नाही. जे शक्य आहे, ते आम्ही करूच. परंतु आमचे लक्ष आहे पुढील विधानसभा निवडणुकीकडे. या निवडणुकीत मनसेच्या हातात सत्ता देवून बघा, मग महाराष्ट्राचा विकास कसा करून दाखवितो ते बघा, असे आवाहनही राज यांनी केले. महाराष्ट्रातील नेते जमीन, फ्लॅटस् घेण्यामागे लागले आहेत. आपल्या पाच-सहा पिढय़ांचे कल्याण त्यांना साधावयाचे आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना काहीही करावयाचे नाही, असा टोलाही त्यांनी हाणला

बुधवार, 11 अप्रैल 2012

मनसेच्या प्रचाराचा नारळ मालेगावमध्ये फुटणार

मनसेच्या प्रचाराचा नारळ मालेगावमध्ये फुटणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, April 12, 2012 AT 01:30 AM (IST)

राज ठाकरे यांची बुधवारी जाहीर सभा

मुंबई- राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. 12) मालेगाव येथे फुटणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने प्रचाराला सुरवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मालेगाव येथील कॉलेज मैदानात ही सभा होईल.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे शिवसेनेप्रमाणेच मनसेनेही दुर्लक्ष केले होते. मनसेनेच्या वतीनेही मुंबई, नाशिक, पुणे महापालिकांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्येच खऱ्या अर्थाने लढत झाली, तर मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जमतील तेवढ्या जागा मिळविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेत केला. मात्र, राज यांनी मालेगावमधील सभेतून प्रचाराला सुुरवात केल्याने ग्रामीण भागातील पाचही महापालिकांमधील निवडणुका तयारीने लढविण्याचे संकेत राज यांनी दिल्याचे मानले जात आहे