शुक्रवार, 3 फ़रवरी 2012

सभा घ्यायची कुठे ते सांगा - राज

सभा घ्यायची कुठे ते सांगा - राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, February 04, 2012 AT 12:47 PM (IST)
  
मुंबई - "गिरगाव चौपाटी, आझाद मैदान आणि आता शिवाजी पार्कवरही जाहीर सभा घ्यायची नाही, तर सभा नक्की घ्यायची कुठे, हे एकदाचे सांगा,'' असा त्रागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

शिवाजी पार्कवरील मनसेच्या सभेला उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर, "मैदान मिळत नसल्याने रस्त्यावरच सभा घेऊ,'' असा इशारा राज यांनी दिला.
""शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला मैदान देताना झुकते माप दिले जाते; मात्र मनसेवर अन्याय केला जात आहे,'' असा आरोप करून राज म्हणाले, ""रस्त्यावर सभा घेतल्यास काय गुन्हे दाखल करायचेत ते करा.''

उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राज यांनी "कृष्णकुंज'वर पत्रकार परिषद घेतली व उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याच वेळी "मी न्यायालयाचा कोणताही अपमान करीत नाही,' असे सांगितले.

राज म्हणाले, "या देशात मतस्वातंत्र्य असून सार्वभौम देशातील नागरिक म्हणून मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.'' राज यांनी थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावर व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे. राज म्हणाले, ""एक परंपरा म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिली जाते. पण त्याच वेळी आम्ही निवडणुकीच्या काळात पहिल्यांदाच "शिवाजी पार्क' मागितल्यावर त्याला मनाई करण्यात येत असल्याबद्दल मला आश्‍चर्य वाटते. हाच प्रकार रस्त्यावरील सभांनाही येत असतो. कुठे रुग्णालयाच्या नावाखाली; तर कुठे शाळांच्या नावाखाली सभांना परवानगी नाकारली जात आहे. शाळा सायंकाळी सुटल्यावरही रात्रीच्या सभांना परवानगी नाकारली जाते. या शाळा काय रात्रशाळा आहेत का?''

"जर निवडणुकीतच आपले मत व्यक्त करण्यासाठी संधी मिळत नसेल तर निवडणुका घेता कशाला,'' असा प्रश्‍न उपस्थित करून निवडणुकाच रद्द करण्याची मागणी राज यांनी या वेळी केली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज यांनी "लक्ष्य' केल्याने भविष्यात दसरा मेळाव्यासाठी परवानगीतील शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे

गुरुवार, 2 फ़रवरी 2012

देवी एकवीरा, मार्तंडा "मनसे'ला पाव रे!

देवी एकवीरा, मार्तंडा "मनसे'ला पाव रे!
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 02, 2012 AT 03:45 AM (IST)
  जेजुरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जेजुरीत खंडोबाचे दर्शन घेतले. मनसेच्या उमेदवारांची यादी खंडोबाच्या चरणाशी ठेवून त्यांनी विजयाचे जणू खंडोबाला साकडेच घातले.

मोरगाव येथील मयूरेश्‍वराचे दर्शन घेऊन राज ठाकरे साडेतीन वाजता गडावर आले. त्यांच्यासमवेत मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर, शिरीष पारकर, शिशिर शिंदे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष बाबा जाधवराव आदी उपस्थित होते. खंडोबाची पूजा करण्यात आली. देवदर्शन व तळी-भंडारा करून त्यांनी भंडारा उधळून कुलधर्म-कुलाचार केला. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते सासवडकडे मार्गस्थ झाले. निवडणूक व इतर विषयासंदर्भात त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा खासगी दौरा असल्याचे निकटच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे ते पत्रकारांशी बोलले नाहीत.

इच्छुकांना हुलकावणी
लोणावळा ः राज ठाकरे यांनी मुंबई व ठाणे महापालिकांचा निवडणूक जाहीरनामा कार्ला गडावरील कुलदैवत एकवीरा देवीच्या चरणी अर्पण केला.
आमदार बाळा नांदगावकर व काही निवडक कार्यकर्त्यांसह ठाकरे बुधवारी वेहेरगाव-कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. मनोभावे पूजा करत निवडणुकीत यश मिळू दे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर लगेच ते मुंबईस रवाना झाले.
महापालिका निवडणुकीत तिकीट मिळालेल्या व इच्छुक उमेदवारांना हुलकावणी देत ठाकरे कार्ल्यास आले होते. मात्र, सहलीसाठी आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना पाहताच जोरदार घोषणाबाजी केल्याने ठाकरेही चकित झाले.

निवडणुकीच्या तोंडावर...
जेजुरीचा खंडोबा हे ठाकरे यांचे कुलदैवत आहे. राज ठाकरे हे यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जेजुरीत आले होते. त्या वेळी त्यांनी जेजुरीत खंडोबाला साकडे घातले होते. आता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी खंडोबाच्या दर्शनासाठी येऊन विजयासाठी साकडे घातल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती

सोमवार, 30 जनवरी 2012

राज ‘निकाला’वर ठाम

राज ‘निकाला’वर ठाम
विशेष प्रतिनिधी , मुंबई

alt‘ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशा सर्वाच्या घरच्यांची मी माफी मागतो,’ असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतरही राज यांनी उमेदवारांची यादी जाहीर करताच मुंबई व ठाण्यात नाराजीची लाट निर्माण झाली. राज यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी रविवारपासून सोमवार सायंकाळपर्यंत आपली कैफियत मांडण्यासाठी नाराजांचे तांडे येत होते. दादरमधील २२ उपशाखाध्यक्षांनी व ८४ गटाध्यक्षांनी तर राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोणीही राजीनामे दिलेले नाहीत, तसेच नाराज असले तरी कोणी बंडखोरी केली नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत यादी बदलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इतक्या लोकांनी नाराजी व्यक्त केली याचाच अर्थ मी विजयाच्या किती जवळ आहे ते स्पष्ट होते असे सांगून राज म्हणाले, मी छातीठोकपणे यादी जाहीर केली आहे. मागच्या दाराने गुपचूप उमेदवारी देण्याचा धंदा केलेला नाही.
मनसेची यादी रविवारी जाहीर झाल्यानंतर दहिसरपासून मुंबईभर नाराजीचा स्फोट झाला. अनेक ठिकाणी महिलांच्या उमेदवारीवरून नाराजी निर्माण झाली. काही आमदारांनी खाजगीत आपला असंतोष व्यक्त केला, तर ठाण्यात नाराजांचे तांडे थेट पक्षकार्यालयावर चालून गेले. काही नाराजांनी आपल्या शाखांवरील राज यांची छायाचित्रे उतरवून शाखांना टाळे ठोकले व मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. राज यांच्या बालेकिल्ल्यात प्रभाग १८५ मधून विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शाखाअध्यक्ष गिरीश धानुरकर यांच्या शाखेतील बावीस उपशाखाध्यक्ष व ८४ गटाध्यक्षांनी आपले राजीनामे आमदार नितीन सरदेसाई यांच्याकडे सादर केले. याबाबत सरदेसाई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सोमवारी दिवसभर आमदार मंगेश सांगळे, राम कदम, बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर हे आपापल्या मतदारसंघातील नाराजांची समजूत काढण्याचे काम करत होते. मात्र अनेक नाराजांनी थेट कृष्णभुवन गाठले. रविवार दुपारपासून पहाटे पाचपर्यंत राज ठाकरे हे स्वत: नाराजांना भेटून त्यांची समजूत काढत होते. सोमवारी सायंकाळपर्यंत अनेक विभागातील नाराजांनी राज यांची भेट घेतली. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशांनी नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र त्यातील एकही बंडखोर नाही. या नाराजांची समजूत काढण्यात आली आहे. तसेच दादरमधील शाखाध्यक्ष गिरीश धानुरकर, यशवंत किल्लेदार यांची समजूत काढण्यात आली असून, एकाही पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर ही वर्षांनुवर्षे जपलेली नाती आहेत. मी त्यांची समजूत काढीन, मात्र यादी बदलणार नाही,’ असेही राज यांनी स्पष्ट केले

रविवार, 29 जनवरी 2012

यंदा किंगमेकर नाही, किंग असू - राज ठाकरे

यंदा किंगमेकर नाही, किंग असू - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 29, 2012 AT 02:36 PM (IST)
 
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्ष किंगमेकरची भूमिका न बजाविता किंग असेल, असा विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) व्यक्त केला.

राज ठाकरे यांनी आज आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक महापालिकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तर नागपूर, सोलापूर आणि उल्हासनगर येथील स्थानिक कार्यकर्ते यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील २२७ पैकी २०८ जागांसाठी, ठाण्यातील १३० पैकी ११५ जागांसाठी, नाशिकमधील १२२ पैकी ११५ जागांसाठी आणि पुण्यातील १५२ पैकी १३८ जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''महाराष्ट्रातून जातीपातीचे राजकारण काढून टाकू, असे आपण कायम म्हणतो. मात्र, जातींना आरक्षण देऊन याला पाठबळ देण्यात येते. पक्षातील नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली नाही, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मी माफी मागतो. प्रसिद्ध केलेल्या यादीत उमेदवारांच्या नावासोबत उमेदवारांचे परीक्षेतील मार्कही देण्यात आले आहेत.