शनिवार, 30 जुलाई 2011

राज ठाकरे जाणार गुजरात दौऱ्यावर

राज ठाकरे जाणार गुजरात दौऱ्यावर
-
Sunday, July 31, 2011 AT 03:30 AM (IST)
  मुंबई - एकेकाळी देशात औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात आता गुजरातच्या प्रगतीचे गुणगान होऊ लागले आहे. गुजरातने कोणत्या प्रकारे विकासाच्या दिशेने प्रवास केला, याचा अभ्यास करण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गुजरातला रवाना होतील.

राज यांच्याबरोबर तज्ज्ञ मंडळी जाणार असून या अभ्यास दौऱ्यात गुजरातमधील विकास प्रकल्पांची पाहणी होणार आहे. तेथील विकास प्रकल्पांचा महाराष्ट्रात कितपत वापर करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. ठाकरे यांचा गुजरात दौरा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर गुजरातमध्येही चर्चेचा विषय ठरणार असल्याचे मानले जात आहे.

साबरमती आश्रम आणि सरदार पटेल यांच्या स्मारकाला अभिवादन करून 3 ऑगस्ट रोजी दौऱ्याची सुरुवात होईल. औद्योगिक विकास, सेझ, पर्यटन, झोपडपट्टी पुनर्वसन, जल पुनर्प्रक्रिया, जलसंधारण, रस्तेविकास, सौर, औष्णिक आणि पवनऊर्जा, मुलींचे शिक्षण, विमा योजना आदी विषयांवर चर्चा होईल. राज ठाकरे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी विचारविनिमय करतील. हे शिष्टमंडळ बडोदा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कच्छ, भरुच आदी शहरांना भेट देईल; तसेच नर्मदा प्रकल्प, वनबंधू ग्राम योजना, राजकोट ऑटो इंजिनिअरिंग, कांकरिया प्रकल्पांची पाहणी करेल

गुरुवार, 28 जुलाई 2011

राज ठाकरेंनी घालवला स्वत:चाच टीआरपी

राज ठाकरेंनी घालवला स्वत:चाच टीआरपी
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, July 29, 2011 AT 02:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हजारोंना भुलवणारे अत्यंत प्रभावी वक्‍ते; पण गिरणी कामगारांच्या मोर्चात भाषण न देण्याचा निर्णय घेत त्यांनी मंच उद्धव ठाकरेंच्या हवाली करून टाकला! महापालिकेतील मतदानावर डोळा ठेवून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघेही गिरणी कामगारांच्या प्रश्‍नावर एक आल्याने भाऊ-भाऊ काय बोलतात, याकडे केवळ कामगारांचेच नव्हे, तर अवघ्या मुंबईचे लक्ष लागले होते. मात्र, राज यांनी न बोलून सदैव आकाशाला भिडणारा त्यांचाच "टीआरपी' गमावल्याचे मानले जात आहे.

मुंबईच्या विकासात पायाचे दगड असलेल्या गिरणी कामगारांच्या मोफत घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दत्ता इस्वलकर आणि प्रवीण घाग यांनी रणशिंग फुंकताच या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय सर्वप्रथम जाहीर केला, तो "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. राजकीय पादत्राणे बाजूला करून कामगारांच्या प्रश्‍नासाठी एक येण्याचे आवाहन राज यांनी करताच शिवसेनेसह अन्य पक्ष त्यात आपणहून सहभागी झाले. सरकारविरोधात हा मोर्चा सर्वांची एकजूट उभारत असतानाच या मोहिमेचा लाभ उचलण्यात पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कमालीचे यशस्वी झाले.

मालकाच्या मदतीने संप फोडण्याचा ठपका भाळी घेऊन फिरणारी शिवसेना नव्या अवतारात आजतरी कामगारांची आम्हीच तारणहार आहोत हे दाखविण्यात यशस्वी ठरते आहे. हे व्यासपीठ कामगारांचे आहे, अशी भूमिका घेऊन त्यापासून दूर राहण्याचा राज यांचा निर्णय उचित असला तरी त्यामुळेच "बंद'ची घोषणा करून हे आंदोलन उद्धव ठाकरे यांना हायजॅक करता येऊ शकले, हे उघड आहे.

डाव्या विचारसरणीची क्षीण होत चाललेली शक्‍ती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले दुर्लक्ष यामुळे गिरणी कामगार संघटनांना आता विरोधी पक्षांचा आधार वाटणे अपरिहार्य होते. मात्र, तरी राज यांनी मंचावर न येणे शिवसेनेला अप्रत्यक्ष फायदा देणारे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

"बंद'ला "मनसे'चा विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते झेंडे घेऊन परत जात असतानाच शिवसेनेने केलेली "बंद'ची घोषणा उद्धव यांच्या कुरघोडीच्या राजकारणाची परिचायक मानली जात आहे. "मनसे'ने "बंद'च्या घोषणेत आपण सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या प्रश्‍नावर एकत्रित आलेले विरोधक सरकारला नमवू शकतील, असे असताना "बंद'ची घोषणा देऊन मुंबईकरांना वेठीला धरण्याचे कारण काय, असा थेट प्रश्‍न "मनसे'ने केला आहे.