गुरुवार, 31 मार्च 2011

बेस्टमध्ये मनसेने जागा पटकावली

बेस्टमध्ये मनसेने जागा पटकावली
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 31, 2011 AT 12:45 AM (IST)
 
मुंबई - मुंबई महापालिकेत समाजवादी पक्षा (सप)चे आणि मनसेचे प्रत्येकी सात सदस्य असल्याने या दोन्ही पक्षांपैकी बेस्ट समितीवर नियुक्त करायच्या एका सदस्यासाठी मंगळवारी (ता.29) पालिका सभागृहात मतदान घ्यावे लागले. ऐन वेळी समाजवादी पक्षाचा सदस्य गैरहजर राहिल्यामुळे मनसेच्या सदस्याला निवडण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय राहिला नाही. भाजपने समाजवादी पक्षाऐवजी मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. अखेर मनसेचे प्रकाश पाटणकर यांनी "बेस्ट'मध्ये जागा मिळवलीच.

पालिकेच्या स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट समित्यांच्या सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी पालिकेच्या सभागृहात या समित्यांच्या सदस्यांच्या नव्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या. पालिकेत सप आणि मनसे यांचे संख्याबळ समान आहे. स्थायी आणि सुधार समितीतील संख्याबळामुळे या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एकेक सदस्य आहे; मात्र बेस्टमध्ये त्यांचा सदस्य नसल्याने या समितीच्या सदस्यत्वासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न चालविले होते. एखाद्या सदस्याच्या निवडीसाठी राजकीय पक्षांनी गट केल्यामुळे त्याच्यासाठी निवडणूक अपरिहार्य ठरते. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली.

मनसेने प्रकाश पाटणकर आणि "सप'ने शेख नझीमुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. निवडणुकीच्या वेळी साजिया आझमी या गैरहजर होत्या. त्यामुळे सपची सदस्यसंख्या सहा झाली, तर मनसेचे सर्व सातही सदस्य हजर असल्याने पाटणकर यांचा एका मताने विजय झाला.
बेस्टमध्ये मनसेला एन्ट्री मिळू नये यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न चालविले होते. महापौर श्रद्धा जाधव आणि सभागृहनेते सुनील प्रभू यांनी भाजपचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भाजपने सपला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना संकटात सापडली. भाजपने मनसेला मतदान केले, तर शिवसेना सपच्या पाठीशी राहिली. मनसेने या निवडणुकीत बाजी मारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

नवनियुक्त सदस्यस्थायी समिती - शिवसेना - शुभदा गुडेकर, कॉंग्रेस - सूर्यवंश ठाकूर, रघुनाथ थवई, भाजप - विद्या ठाकूर.
सुधार समिती - भाजप - भालचंद्र शिरसाट, शिवसेना - दिलीप शिंदे, शिवकुमार झा, राष्ट्रवादी कॉंग्रेस - चारू चंदन शर्मा.
शिक्षण समिती - कॉंग्रेस - भोमसिंह राठोड, भाजप - विनोद घेडिया, उज्ज्वला मोडक, राष्ट्रवादी कॉंग्रेस - सारिका ग्रेसेस.
बेस्ट समिती - मनसे - प्रकाश पाटणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस - शरद शिवकुमार पवार.

सोमवार, 28 मार्च 2011

मनसे'च्या कार्यकर्त्यांची महापालिकेत तोडफोड

मनसे'च्या कार्यकर्त्यांची महापालिकेत तोडफोड
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 29, 2011 AT 12:30 AM (IST)
 
नांदेड - नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा तक्रारी देऊनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल करून तोडफोड केली.

शहरातील गणेशनगर भागातील गणेश मंदिर ते प्राथमिक शाळा या रस्त्यावरील घरांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेजचे पाणी येत असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून असे पाणी येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. या भागातील पाइपलाइन बदलावी, अशी मागणीही करण्यात आली होती; मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोद पावडे, पप्पू मनसुके, सय्यद फारूख, अच्युत जगताप, दत्ता घुमशेटवार, अनुप आगाशे, अनिल कदम, राजेश अन्नदाते यांच्यासह इतर चाळीस कार्यकर्ते सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात आले. या वेळी सहायक आयुक्त प्रकाश येवले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत गच्चे आणि उपअभियंता भागानगरे कुठे आहेत? अशी विचारणा या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली. श्री. येवले यांनी गच्चे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यावर मनसेचे पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ड्रेनेजमिश्रित पाणीही सोबत आणले होते. संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गच्चे यांच्या खुर्चीला या ड्रेनेजमिश्रित पाण्याने स्नान घातले आणि घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयातील फाईल, संचिका फेकण्यास सुरवात केली. टेबलवरील काच फोडण्यात आला. खुर्च्या तोडण्यात आल्या. काही खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. टेबलही उचलून फेकण्यात आले. संगणकाचीही मोडतोड करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करीत सर्वजण घटनास्थळाहून निघून गेले. या प्रकाराने काही काळ महापालिकेत गोंधळ झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील देशमुख व इतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. पाणीपुरवठा विभागात फाईली, संचिका अस्ताव्यस्त पडल्या होत्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. टेबल-खुर्च्या आणि संगणकाची मोडतोड झाली होती. कार्यकारी अभियंता गच्चे यानंतर तेथे आले.

एक लाखाचे नुकसान
"मनसे'च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात शासकीय मालमत्तेचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी सहायक आयुक्त येवले यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राज ठाकरेंच्या सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा

राज ठाकरेंच्या सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा
   वृत्तसंस्था
Monday, March 28, 2011 AT 05:36 PM (IST)
 
पणजी - बंदुक दाखवून ट्रक चालकाला धमकाविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पणजीपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बोरिम गावाजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधिक्षक अरविंद गुनास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने पोंडा पोलिस स्टेशनमध्ये या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर धमकाविणाऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांना लगेच माहिती हाती लागली नाही. मात्र, राज ठाकरे यांचा ताफा मडगाव येथून गेल्याचे समजल्यानंतर हे कृत्य राज ठाकरे यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या अधिकाऱ्याने ट्रक चालकाला मारहाण करीत त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. ट्रक चालकावर हल्ला करणारा अधिकारी महाराष्ट्र पोलिस दलातील असल्याचे समजते