मंगलवार, 22 जून 2010

राज ठाकरे यांनी 'राजनीती' पाहिला !

राज ठाकरे यांनी 'राजनीती' पाहिला !
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 23, 2010 AT 12:30 AM (IST)
 

लातूर - न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (ता. 21) रात्री येथील पीव्हीआर चित्रपटगृहात पत्रकारांसह "राजनीती' हा चित्रपट पाहिला. "राजकारणातील भाऊबंदकी'वर हा चित्रपट आधारित आहे.

उमरगा येथील न्यायालयात हजर राहिल्यावर श्री. ठाकरे सोमवारी दुपारी येथे आले होते. दुपारी पत्रकारांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी दिवसभर चर्चा केली. रात्री त्यांचा येथेच मुक्काम होता. दुसरा कोणताही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे त्यांनी रात्री "राजनीती' चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांना निरोप देऊन बोलावून घेतले. तीन तास पत्रकार व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी "राजनीती' चित्रपट पाहिला. सत्ता, खुर्चीसाठी भाऊ भावाचा नसतो या थीमवर हा चित्रपट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर कार्यकर्त्यात याच विषयाची चर्चा होती. पीव्हीआरच्या वतीने सिनेमा मॅनेजर पवनसिंग, चित्तरंजन मलिक, विलास दाभाडे, विष्णू कुलकर्णी, इरफान शेख, अनिल कुलकर्णी, लक्ष्मीकांत शिंदे यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. श्री. ठाकरे चित्रपट पाहणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. चित्रपटगृहातही अनेक पोलिस तैनात होते. श्री. ठाकरे यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था वेगळीच होती. चित्रपट संपल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे श्री. ठाकरे पहिल्यांदा चित्रपटगृहाबाहेर जातील, त्यानंतर प्रेक्षकांनी जावे, असे सांगण्यात आले होते; पण श्री. ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रेक्षकांना बाहेर जाऊ दिले व नंतर ते पत्रकारांशी बोलत चित्रपटगृहाबाहेर पडले.

सोमवार, 21 जून 2010

राज ठाकरेही जेव्हा जामिनासाठी वाट पाहतात...

राज ठाकरेही जेव्हा जामिनासाठी वाट पाहतात...
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:00 AM (IST)
 

उस्मानाबाद - पदाधिकाऱयांनी जामिनासाठी सक्षम व्यक्तीची व्यवस्थाच न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी कळंब येथील न्यायालयात १५ मिनिटे ताटकळत बसावे लागले. यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी पदाधिकाऱयांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर तातडीने जामिनाची व्यवस्था करण्यात आली आणि न्यायालयातून त्यांची सुटका झाली.

कळंब येथील दंगलप्रकऱणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरील खटल्याच्या सुनावणीसाठी ते येथे आले होते. या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मिळू शकतो. मात्र, त्यासाठी सक्षम व्यक्तीचा जामीन मिळणे आवश्यक होते. कळंब येथील पदाधिकाऱयांना हे लक्षात न आल्याने त्यांनी तशी व्यवस्थाच केली नाही. परिणामी, न्यायालयाचे व्यवहार सुरू झाल्यानंतरही राज ठाकरे यांचा खटला सुनावणीसाठी घेतला गेला नव्हता. या प्रकाराने संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱयांना अक्षरशः हाकलून लावले.  त्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि अखेर त्यांना जामीन मिळाला.

उमरगा येथे एसटी बसवर दगडफेक प्रकरणी सोमवारी तेथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

राज यांना पाहण्याची अपेक्षा पूर्ण, ऐकण्याची अधुरीच..

राज यांना पाहण्याची अपेक्षा पूर्ण, ऐकण्याची अधुरीच....
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:30 AM (IST)
 

भीमाशंकर वाघमारे : सकाळ वृत्तसेवाउस्मानाबाद - त्यांची प्रतीक्षा सर्वांनाच होती... अगदी सकाळपासून अणदूरपासून ते उमरग्यापर्यंत मार्गावर असलेल्या गावांतील कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा केलेली गर्दी... मोठाले डिजिटल फलकही तोऱ्यात होते... उमरगा न्यायालयाचा आवार तर फुटून निघाला होता... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भाव होते, त्यांना एकदा पाहण्याचे.. काहींना त्यांना ऐकण्याचे.. पाहण्याची अपेक्षा पूर्ण झाली ऐकण्याची मात्र "अधुरी'च राहिली. केवळ "आजि म्या राज पाहिला...' एवढे एकच समाधान चेहऱ्यावर झळकवत कार्यकर्त्यांना परतावे लागले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून (ता. 21) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. उमरगा येथील न्यायालयात हजेरी लावून सुरू झालेला त्यांचा दौरा मंगळवारी (ता. 22) कळंबच्या न्यायालयात हजेरी लावून संपणार आहे. राज ठाकरे येणार म्हटल्यावर "मनसे'च्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारणे स्वाभाविक आहे. यावेळी मात्र सामान्य तरुणही राज ठाकरे यांना पाहण्यासाठी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे विशेष. राज यांची सध्या असलेली "क्रेझ' पाहता त्यांच्या एखाद्या सभेचा कार्यक्रम आयोजित होऊ शकला असता; मात्र तो का झाला नाही, हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाच माहीत.

सकाळी अकराच्या सुमारास राज ठाकरे यांचे न्यायालयाच्या आवारात आगमन झाल्यापासून त्यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी गर्दी झाली. एक तासानंतर ते बाहेर आले. कार्यकर्त्यांची गर्दी पाहून राज ठाकरेही खूष झाले. गर्दी पाहून त्यांना कार्यकर्त्यांना पाच मिनिटे अभिवादन केले नि निघून गेले. जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयघोषही केला. त्यांना ऐकण्याची इच्छा मात्र अधुरीच राहून गेली. "बाईट' न दिल्याने इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचाही हिरमोड झाला.

पोलिसांचा ढिसाळपणान्यायालयाच्या आवारात पोलिसांनी केलेले बंदोबस्ताचे नियोजन अगदीच तोकडे पडले. पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी तेथे असूनही पोलिसांचे नियोजन गांभीर्याने झाले नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या आवारात जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये, शांतता बाळगावी, असे आवाहन मनसेचे परिवहन विभागाचे मराठवाडा अध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी केले. पोलिसांनीही केले. त्यामुळे सुरवातीला शांतता पसरली. राज ठाकरे आल्यानंतर मात्र गर्दी उसळली व न्यायालयाच्या आवारातच कार्यकर्त्यांची गर्दी झाली. राज ठाकरे यांनाही न्यायालयात जाताना कसरत करावी लागली. त्यातच भर पडली ती राज ठाकरे यांच्या खासगी सुरक्षारक्षकांच्या अरेरावीची. पोलिसांनी व्यवस्थित नियोजन केले असते तर न्यायालयाच्या आवारातील गोंधळच घडला नसता, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

आता पक्षाचे काय..!राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर "मनसे' कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे, हे खरे आहे. यातून मात्र आता नेत्यांनीही आपापले गट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. जिल्ह्यात पक्ष वाढला पाहिजे, असे "मनसे'च्या प्रत्येक नेत्याचे मत असले तरी काही नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अपवाद सोडले तर अनेकांची कृती तशी नाही. आपापले गट सांभाळण्यातच धन्यता मानणारे अनेकजण आहेत. त्यामुळेच पक्षवाढीला मर्यादा येत आहेत, ही सामान्य "मनसे' कार्यकर्त्यांची भावना आता राज ठाकरे मनावर घेतील काय, हा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलित काय, या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना नेत्यांनी आपसांतील मतभेद विसरून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले तरी खूप मोठे यश असेल.

राज ठाकरे रंगले पत्रकारांशी अनौपचारिक गप्पात

राज ठाकरे रंगले पत्रकारांशी अनौपचारिक गप्पात
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:30 AM (IST)
 

लातूर - लातूर जिल्ह्यात पाऊस कसा आहे, लातूर महानगरपालिका झाली नाही का? असे म्हणतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. पक्ष काढल्याने जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

उमरगा येथे न्यायालयीन कामासाठी आले होते. तेथून सोमवारी (ता. 21) मुक्कामासाठी ते येथे आले आहेत. मंगळवारी ते कळंबला न्यायालयीन कामासाठी जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनर्स लावण्यात आले होते. चौका चौकात कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन झाले. येथील राजीव गांधी चौकात पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. पण गाडीतूनच त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन करून ते विश्रामगृहात गेले. तेथे पत्रकारांनी त्यांना गाठले. मी आज बातमी देणार नाही, तुम्हाला भेटायला आलो आहे, असे म्हणत श्री. ठाकरे यांनी गप्पा मारण्यास सुरवात केली. एक तास या गप्पा रंगल्या.

महानगरपालिका नाही?
जिल्ह्यात पाऊस कसा झाला आहे. सोलापूरला पाऊस जास्त झाला. लातूर महानगरपालिका झाली का? असे त्यांनी विचारले. लातूरला नऊ वर्ष मुख्यमंत्रिपद होते. महापालिका का झाली नाही? महापालिका झाल्यानंतर अनुदान मोठे येते, शहराच्या विकास करण्यास मदत होते. पण महानगरपालिका चालविणारे चांगले पाहिजेत, असे श्री. ठाकरे म्हणाले.

अमेरिकेत कार्डवर टोलटॅक्‍स
चर्चेत टोल टॅक्‍सचा विषय निघाला. यावर श्री. ठाकरे यांनी अमेरिकेतील उदाहरण दिले. काही दिवसापूर्वी अमेरिकेला गेलो होतो. तेथेही टोल टॅक्‍स घेतला जातो. पण तेथे टोलनाक्‍यावर पॅनल बोर्ड लावण्यात आले आहेत. तेथे कार्ड दाखविले की आपोआप आपल्या खात्यातून पैसे जमा होतात. कार्ड नाही दाखविले की लाल बत्ती लागते. ती तोडून गाडी नेली तर गाडीचा फोटो निघतो. आपल्या घरी त्याचे बिल येते. अशी पद्धत आहे. तेथे नाक्‍यावर कोणताही माणूस उभा राहत नाही. आपल्याकडे मात्र विचित्र पद्धत आहे. आपले नेते परदेशात जातात काय घेऊन येतात माहीत नाही. मुदत संपूनही सुरू असलेल्या टोल नाक्‍याकडे जरा लक्ष द्या असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले.

वीज प्रकल्पांना विरोध नको?
 अमरावतीत वीज प्रकल्पाला विरोध होत आहे. ते चुकीचे आहे. वीज प्रकल्प झाल्याशिवाय भारनियमन कमी होणार नाही. एकीकडे भारनियमन म्हणून ओरडायचे अन्‌ दुसरीकडे विरोध करायचा. यातून कसे भारनियमन कमी होणार? त्यामुळे वीज प्रकल्पांना विरोध करू नका असे माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. जे विरोध करतात ते खासगीत जाऊन आपल्या किमती वाढवून घेतात, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
विचारले होते का?
 शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून शिर्डीत साईबाबांना नवस केला. या विषयावरील चर्चेत नवस बोलताना विचारले होते का? असा प्रश्‍नच श्री. ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

लक्ष घालीत नाही
 औरंगाबाद महानगरपालिकेत झालेल्या गोंधळाविषयी ते म्हणाले, इतक्‍या लहान गोष्टीत मी लक्ष घालीत नाही. काय कारवाई करायची ते शासनाने ठरवावे, असे त्यांनी सांगितले.
तरीही विदर्भात कॉंग्रेसच!
वेगळ्या विदर्भाविषयी ते बोलले. विदर्भापेक्षा मराठवाडा मागासलेला आहे. तरी येथील जनता वेगळा मराठवाडा मागत नाही. विदर्भात अनेक नेते होऊन गेले. मुख्यमंत्री झाले. त्यांनी विकास करायला हवा होता. कोकणही मागासलेला आहे. म्हणून काय सर्वांनीच वेगळे मागायचे का? वेगळा विदर्भ मागायचा अन्‌ कॉंग्रेसलाच विजयी करायचे ? नेमका विरोध कोणाला हेच कळत नाही, असे श्री. ठाकरे म्हणाले. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख अभय साळुंके उपस्थित होते.